Ad will apear here
Next
प्रेमपत्र
फार नाही, तीन चार दशकांपूर्वीपर्यंत (कम्प्युटर आणि मोबाइल अस्तित्वात येण्याआधीच्या काळात), प्रेमात पडलेले दोन जीव एकेमकांना हाताने लिहून प्रेमपत्र पाठवत असत. अशाच एका प्रेमपत्राने केलेल्या घोटाळ्यामुळे झालेले गैरसमज आणि त्याच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या एका हळुवार प्रेमाची कथा सांगणारा दिग्दर्शक बिमल रॉय यांचा, शशी कपूर आणि साधना या गोड जोडीचा सिनेमा म्हणजे ‘प्रेमपत्र.’ आजच्या ‘सिनेसफर’मध्ये त्या सिनेमाबद्दल...
....... 
सलीलदा केवळ थोर संगीतकार नव्हते, तर त्यांच्यात एक उत्तम कवी आणि लेखकही दडलेला होता. त्यांनी १९५२ साली बिमलदांच्या ‘दो बीघा जमीन’ची कथा लिहिली आणि संगीत दिलं, तर त्यांच्याचसाठी पुढे १९६२ साली त्यांनी ‘प्रेमपत्र’ची पटकथा लिहिली आणि अर्थातच अत्यंत मधुर संगीतही दिलं.

१९६० साली शशधर मुखर्जींच्या ‘लव्ह इन सिमला’मधून स्टायलिश पदार्पण केलेल्या साधनाने त्याच वर्षी बिमल रॉय यांच्या ‘परख’मधून ‘ओ सजना बरखा बहार आयी’ गात रसिकांची पसंती मिळवली होती. पाठोपाठच १९६१ साली विजय आनंदच्या दिग्दर्शनाखाली ‘हम दोनों’मधून देव आनंदबरोबर ‘अभी ना जाओ छोडकर’ म्हणत ती आपल्या दिलखेचक सौंदर्याने रसिकांच्या हृदयात जाऊनही बसली. त्याच्या पुढच्याच वर्षी, १९६२ साली तिने बिमलदांचा ‘प्रेमपत्र’ स्वीकारला, तो नवख्या शशी कपूरबरोबर! शशीने आदल्याच वर्षी १९६१ साली, यश चोप्रांच्या राष्ट्रपतिपदक विजेत्या ‘धर्मपुत्र’मधून पदार्पण केलं होतं; पण त्यापाठोपाठचा, नंदाबरोबरचा त्याचा ‘चार दीवारी’ फ्लॉप झाला होता. शशी दिसायला अत्यंत राजबिंडा आणि तशात अनेक वर्षं हिंदी आणि इंग्लिश थिएटर करून फिल्ममध्ये शिरलेला. त्यामुळे तो टिपिकल रोल्सपेक्षा हटके भूमिकांच्या शोधात होता. हा त्याचा तिसराच सिनेमा. (आपल्या दोन्ही भावांप्रमाणे त्यानेही सुरूवातीला तलवारकट मिशी ठेवलेली दिसते यात.)

‘प्रेमपत्र’मधून बिमलदांनी हे दोन देखणे चेहरे पहिल्यांदा एकत्र आणले. दोघांचीही कामं उत्तम झाली आणि यातली गाणीही गाजली; पण सिनेमातलं उपकथानक किंचित लांबल्याने तो संथ होऊन लोकांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे असेल कदाचित; पण शशी आणि साधना ही अत्यंत गोड जोडी पुन्हा कधीही एकत्र आली नाही हे प्रेक्षकांचं बॅड लक. प्रेमपत्राच्या घोटाळ्याची कथा ही अशी. 

आई-वडिलांचं छत्र हरवलेला अरुण (शशी कपूर) लहानपणापासून वाढलाय डॉ. माथुर (रामचंद्र वर्दे) या त्याच्या वडिलांच्या मित्राच्या घरी. त्यांची मुलगी रत्ना (प्रवीण चौधरी) ही अगदी लहानपणापासून त्याच्याबरोबर वाढलेली आणि म्हणून त्याला खरं तर बहिणीसमान; पण ती मात्र त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी. कायमच त्याला फॉलो करणारी. अरुणच्या सर्व गोष्टींची तिला पक्की माहिती, इतकी की ती एव्हाना अरुणच्या हस्ताक्षराचीही सहीसही नक्कल करायला शिकली आहे. अत्यंत हुशार आणि आपल्या कामात सिन्सिअर असणारा अरुण एमबीबीएस झालाय, तेही फर्स्टक्लास फर्स्ट! आता हाउससर्जन म्हणून काम बघतोय. त्याच कॉलेजमध्ये आहेत त्याचे मित्र केदार (राजेंद्रनाथ) आणि सुमित्रा (चांद उस्मानी). त्यांची कॉलेजक्वीन आहे कविता कपूर (साधना). तिला कॉलेजमधली टारगट मुलं वरचेवर निनावी प्रेमपत्र पाठवून हैराण करत असतात आणि ती प्रिन्सिपलकडे या त्रासाबद्दल तक्रार करायचीच या निर्णयाप्रत आलेली असते. 

सिनेमा सुरू होतो तो वैतागलेल्या रत्नाची मनःस्थिती दाखवत. कारण आदल्या दिवशी तिचा वाढदिवस असूनही अरुणने टांग दिल्याने ती त्याच्यावर चिडलेली असते. त्यांची लटकी भांडणं नित्याचीच. तिकडे हॉस्पिटलमध्ये अरुणला, परदेशात उच्च शिक्षणाला जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळण्यासाठी त्याचं नाव कॉलेजतर्फे सुचवणार असल्याची चांगली बातमी कळते आणि आनंदाने तो केदारला सांगायला धावत निघतो. जिन्यात त्याची टक्कर कविताशी होते. तिला आधी तो तिच्यावर लट्टू असणारा कुणी कॉलेजमधला बदमाश मुलगाच वाटतो; पण सुमित्रा अरुणची बाजू घेऊन त्याची तारीफ करते, तो किती गुणी, सज्जन आणि हुशार मुलगा आहे ते सांगते. केदार आणि सुमित्रा अरुण आणि कविताची जोडी जमवून देण्याचं ठरवतात! त्या प्लॅनप्रमाणे सुमित्रा रात्रीच्या ड्युटीसाठी अरुणबरोबर स्वतःऐवजी कविताला पाठवते. रात्री दोघं मिळून एक इमर्जन्सी ऑपरेशन पार पाडतात. एव्हाना कवितांचं अरुणविषयी चांगलं मत बनतं. सकाळी निघाल्यावर कविता आपल्या कारमधून अरुणला डॉ. माथुरांच्या बंगल्यापर्यंत सोडायला जाते. कारमधून जाताना दोघांचं एकमेकांकडे चोरून कटाक्ष टाकणं.... बघण्यातून प्रेमाची चाहूल..... अरुण कारमधून उतरतो आणि कविताशी बोलत असताना बाल्कनीतून मैत्रिणीबरोबर रत्ना ते बघते. तिचा जळफळाट होतो. त्यात तिची मैत्रीण तिला कविता कॉलेजक्वीन असल्याचं आणि तिला एकाहून एक निनावी प्रेमपत्रं येत असल्याची हकीकत रंगवून सांगते. रत्नाचा जळफळाट अधिकच वाढतो. तिकडे अरुण आणि कविता एकमेकांच्या आठवणीत (मुकेश लताचं मधुर गाणं ‘दो अखियां झुकीझुकीसी..’)..

दुसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजमध्ये एकच खळबळ उडते. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर अरुण कविताविषयी काहीबाही लिहिलेलं असतं. प्रोफेसर क्लासमधल्या मुलांना त्याबद्दल चांगलंच फैलावर घेतात. कविताचा शांत चेहरा; पण मनात बरीच खळबळ....

दुसऱ्या दिवशी अरुण एकटा असताना अभ्यासाच्या नावाखाली रत्ना काहीबाही शंका विचारत बसते. तिचे विचित्र प्रश्न ऐकून अरुण वैतागतो आणि खेकसून निघून जातो. रडवेली रत्ना मुसमुसत बसते. डॉ. माथुर लेकीची प्रेमाने चौकशी करतात आणि त्यांना रत्नाचा अरुणकडे असलेला ओढा समजतो. ते अरुणशी त्याबद्दल बोलतात; पण अरुण रत्ना आपल्याला बहिणीसमान असल्याची त्यांची खात्री पटवून आपण रत्नाला समजावू असं सांगतो... पण रत्ना काहीएक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. अरुणच्या मनात कविताविषयी प्रेम आहे हे उमगून आता मात्र ती कवितावर चांगलीच भडकते. त्या रागाच्या भरात तिच्या मनात काही प्लॅन्स तयार होतात...


पुढचा दिवस पुन्हा एकदा मेडिकल कॉलेजमध्ये खळबळ! कारण नेहमीप्रमाणे कविताच्या नावाने आणखी एक प्रेमपत्र आलेलं असतं; पण या खेपेला ते निनावी नसतं, तर त्याखाली चक्क अरुणची सही असते! लेडीज सेक्शनमध्ये त्या पत्राचं जाहीर वाचन होतं आणि तेवढ्यातच समोर आलेल्या कविताला त्याबद्दल सर्वकाही समजतं. मैत्रिणींनी वारंवार डिवचून आणि टोचून बोलल्यामुळे साधीसुधी कविता पराकोटीची चिडते. त्यातच त्या तिला पुन्हा एखादं प्रेमपत्र आल्यावर, तिने प्रिन्सिपॉलकडे जाण्याचा केलेला निर्धार आठवून देतात. वैतागलेली कविता रागाच्या भरात पत्र घेऊन सरळ तक्रार दाखल करण्यासाठी प्रिन्सिपॉलचं ऑफिस गाठते; पण तिच्या क्षणिक रागाचा विपरीत परिणाम होतो. प्रिन्सिपॉल अरुणची प्रेमपत्रं पाठवल्याबद्दल खरडपट्टी काढतात. आपलंच हस्ताक्षर पाहून अरुणला ते रत्नाचं काम असल्याची जाणीव होते; पण तो गप्प बसतो. शिक्षा म्हणून प्रिन्सिपॉल त्याची परदेशी जाण्याची स्कॉलरशिपची शिफारस रद्द करतात. अरुण भयंकर संतापतो. एकीकडे प्रिन्सिपॉलनी काही बोलण्याची संधीच न दिल्याने तो दुखावला गेलाय. दुसरीकडे ते प्रेमपत्र रत्नाने लिहिलंय हे तर सांगू शकत नसल्यामुळे त्याची कोंडीही झाली आहे. कविताने ही तक्रार करून आपलं आयुष्य असं क्षणार्धात उद्ध्वस्त केल्यामुळे त्याला तिचा प्रचंड राग आलाय. तो तडकाफडकी डॉ. माथुरांचा बंगला सोडून गावाला नातेवाईकांकडे निघून जातो. आपण केवढा घोटाळा करून बसलो हे कळून रत्ना कविताकडे जाऊन खरं काय ते तिला सांगते. कवितालाही कळून चुकतं, केवढा अनर्थ होऊन बसलाय ते; पण आता तिने अरुणला भेटून माफी मागण्यासाठी तो गावाहून पुन्हा शहरात परत येईपर्यंत त्याची वाट बघावी असा सल्ला सुमित्रा तिला देते. 

इकडे अरुणचे ते काका त्याला घेऊन गावच्या जमीनदाराकडे त्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी कर्ज मागण्यासाठी घेऊन जातात. अरुणची हुशारी पाहून त्याला कर्ज द्यायला ते तयार होतातच; शिवाय वर त्याला आपल्या मुलीशी ताराशी (सीमा देव) लग्न करून जावई बनवण्याची इच्छा प्रकट करतात. अरुण तयार नसतो; पण त्याचे काका त्याला त्याची आई वैद्यकीय मदत न मिळाल्याने गेल्याची आणि त्याच्या वडिलांची त्याने मोठा डॉक्टर बनावं अशी स्वप्नं बघितल्याची आठवण करून देतात. अरुण ताराला न बघताच मनाविरुद्ध हे प्रपोझल स्वीकारतो; पण एका अटीवर, की तो शिक्षण पूर्ण करून परत आल्यावरच लग्नाला तयार होईल. हा प्रस्ताव सर्वांना मंजूर होतो आणि अरुण इंग्लंडला जायला निघतो.

इकडे जमीनदार आपल्या बहिणीला आणि भाचीला ती खबर द्यायला शहरात येतो. त्याची भाची म्हणजे कविता. तिला आपल्या मामेबहिणीचं लग्न अरुणशी ठरलंय हे ऐकून धक्काच बसतो. अरुणची बोट निघते... गर्दीपासून दूर त्याला मूक निरोप द्यायला कविताही सर्वांच्या नकळत तिथे पोहोचलेली असते.... समुद्राच्या खळाळत्या लाटा तिच्या मनातल्या उचंबळणाऱ्या भावनांशी जणू स्पर्धाच करत असतात....

काही दिवस लोटलेत. कविताच्या आई-वडिलांनी त्यांच्या परिचयातल्या सुभाषला (सुधीर) कवितासाठी पसंत केलंय. तो घरी आलाय आणि त्याच वेळी कविताचे ते जमीनदार मामा आपल्या मुलीला ताराला घेऊन तिथे येतात. त्यांची इच्छा असते, की ताराने काही दिवस कविताबरोबर राहावं आणि अरुण इंग्लंडहून परत येईपर्यंत कविताने गावच्या ताराला आपल्यासारखं शहरी बनवावं. दरम्यान, ताराच्या सौंदर्याने सुभाषची विकेट गेलेली असते. 

ताराला शहरी एटिकेट्स शिकवून मॉडर्न बनवणं सुरू होतं. दरम्यान ताराचे वडील तिला आग्रह करतात, की तिने अरुणला पत्रं पाठवावीत म्हणजे त्यांच्यात काही ओळख, बंध तयार होतील; पण तारा आपल्याला ते काम जमणार नाही म्हणून कविताला गळ घालते. तेवढ्यात कविताला फिरायला घेऊन जाण्यासाठी सुभाष तिथे येतो आणि मग कविता बहिणीच्या प्रेमाखातर प्रेमपत्र लिहायला बसते आणि तारा तिच्याऐवजी सुभाषबरोबर फिरायला बाहेर पडते. कविता अरुणला पत्र पाठवते ‘तारा’ म्हणूनच! अरुण ते सुंदर प्रेमपत्र मिळाल्यावर भलताच खूश होतो. तिला तो लागलीच उत्तर पाठवतो. तारा ते पत्र कविताला वाचून दाखवते. ती गावची असूनही इतक्या सुंदर भाषेत पत्र लिहू शकते, याचं त्याला अप्रूप वाटल्याचं त्याने लिहिलेलं असतं. पुढे त्याने आपल्या आयुष्यात तिच्या आधी एक खूप छान मुलगी येऊन गेल्याचं मोकळेपणानं लिहून आधी देवीसमान वाटलेल्या त्या मुलीनं धोका दिला वगैरे उल्लेख असतात. अर्थातच तो उल्लेख कोणाचा आहे हे उमजून कविता दु:खी होते. त्याने पत्रात ताराला जुनं दु:ख विसरण्यासाठी वरचेवर पत्रं पाठवत राहण्याची लाडिक विनंती केलेली असते. कविता पुन्हा तारा बनून पत्र पाठवते. दुसऱ्या पत्राच्या उत्तरात त्याने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लेखनाची, भावना व्यक्त करण्याची भरभरून तारीफ केलेली असते. भले त्याचा आपल्यावर ‘कविता’ म्हणून राग आहे; पण ‘तारा’ म्हणून तो आपल्या लेखनाच्या इतक्या प्रेमात आहे हे बघून कविता त्याही परिस्थितीत खूश होते. तिच्या मनात त्याच्याविषयी त्याही परिस्थितीत प्रेम दाटून येतं आणि ती गाण्यातून आपली भावना व्यक्त करते. (एक अवीट गोडीचं कमालीचं मधुर गाणं – ‘अब और ना कुछ भी याद रहा..’).... तिचा ‘तारा’ म्हणून त्याला प्रेमपत्र लिहिण्याचा सिलसिला सुरू राहतो.....

तिकडे एक दिवस लॅबोरेटरीत काम करताना त्याचं ध्यान त्या पत्रात अडकलेलं राहून त्याचं दुर्लक्ष होतं आणि त्या रसायनाचा स्फोट होऊन त्याचे डोळे निकामी होतात. अशा अवस्थेत त्याच्या हातात ताराचा हात द्यायला जमीनदाराचा विरोध असतो. कविताला हे कळून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती सुमित्राला जाऊन भेटते आणि सर्व घटना सांगते. ‘कविता’ म्हणून आपला तिरस्कार करणारा अरुण आपल्याच पत्र लिहिणाऱ्या ‘तारा’ या रूपावर मात्र प्रेम करतोय हे विचित्र सत्य तिला सांगते. सुमित्रा आणि केदार अरुणला उपचारासाठी आपल्याच नर्सिंग होममध्ये दाखल करून घेतात. तिथे आलेले डोळ्यांचे स्पेशालिस्ट अरुणचे डोळे पुन्हा ठीक होण्याची आशा असल्याचं सांगतात. त्याचा ताप उतरून दोन आठवडे आराम पडल्यावर ऑपरेशन करू या म्हणून सांगतात. 

एकीकडे अरुणचा सारखा ‘तारा मला बघायला का आली नाही अजून? का येत नाहीये? ती आजारी असेल तर मलाच घेऊन चला तिच्याजवळ,’ असाच घोष चालू असतो. तिकडे वडिलांचा विरोध असल्यामुळे आणि हळूहळू सुभाषमध्ये गुंतत चालल्यामुळे ताराला अरुणला भेटण्यात अजिबातच स्वारस्य नसतं. शेवटी सुमित्रा कवितालाच अरुणसमोर तारा बनून जाण्याची विनंती करते. कारण तसंही अरुणचे डोळे निकामी असल्याने तो बघू शकणार नसतो आणि ताराला त्याने कधी पाहिलेलं नसतंच. कविताला काय करावं हे सुचत नाही. शेवटी ती बाहेरगावी काही दिवस जायचं ठरवून जाण्याआधी एकदा अरुणला पाहायला नर्सिंग होममध्ये येते. पडद्याआड उभं असताना अरुणचं विव्हळणं आणि आक्रोश बघून ती हादरते. तेवढ्यात न राहवून बेडवरून उठणाऱ्या अरुणला तिची चाहूल लागते. ‘तारा’ समजून तिला जवळ बोलावून अरुण तिला स्पर्श करतो. तिला बघू शकत नसल्याबद्दल नशिबाला दोष देतो; पण आता ती जवळ असल्याबद्दल देवाचे आभार मानतो. आता मी नक्की बरा होणार असा विश्वास व्यक्त करतो. केदार आणि सुमित्राला आता ते नाटक चालू ठेवणं भाग असतं. 

अरुण सुमित्राजवळ भारावून ताराचं गुणगान करत असतो. तिच्या पत्रांची तारीफ करतो. तेवढ्यात तारा बनलेली कविता त्याच्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन येते. कमालीचा खूश झालेला अरुण उद्गारतो, ‘तुम्हारे आतेही कमरा महक उठा। ये तो मैं नही कह सकता, की उनके देखेसे आ जाती है मूँहपर रौनक, लेकीन ना जाने क्या जादू है तुम्हारी आवाज में, की उधर तुम्हारे होठोसे फूल झडे और इधर मेरी आंखोका अंधेरा कम होने लगा...’ आणि मग तो बोलत सुटतो.... तिच्याकडून औषध घेणं..... तिने त्याचं तोंड बंद करत तोंडात थर्मामीटर खुपसणं.... तिच्या हातून त्याचं नाश्ता करणं.... पाहतापाहता त्यांची भावनिक जवळीक....(या सीनमध्ये शशी आणि साधनाची केमिस्ट्री कमालीची गोड...) 

दुसऱ्या दिवशी गप्पा मारताना अचानक सोसाट्याचा वारा येतो...बाहेरचं आल्हाददायक वातावरण.....अरुण ताराला (कविताला) त्याला घेऊन बाहेर गॅलरीत नेण्याची विनंती करतो आणि मग दोघांचं अत्यंत सुरीलं गाणं (तलत-लताचं ‘सावन की रातोंमे ऐसा भी होता है’..)

पुढच्याच प्रसंगात पुन्हा दोघांचं आणखी असंच अमाप गोड गाणं –(तलत-लताचं ‘ये मेरे अंधेरे उजाले न होते, अगर तुम न आते मेरी जिंदगी मे’)....

(या दोन्ही गाण्यांत शशी आणि साधनाची जोडी इतकी सुरेख दिसली आहे, की राहूनराहून वाटतं त्यांना पुन्हा कोणी एकत्र का नाही आणलं सिनेमांत?)......

आणि ऑपरेशनचा दिवस उजाडतो. ऑपरेशन होऊन अरुणच्या डोळ्यांवरची पट्टी काढली जाते... हळूहळू रूममधले दिवे लावले जातात. कविता पडद्याआड लपून सर्व बघते आहे. अरुणला आता सगळं दिसतंय... अरुण अर्थातच ताराला बोलावतो.... खऱ्या ताराला समोर आणलं जातं.. पण तारा संकोचून दूर उभी. अरुण तिला जवळ बोलावतो. तिचा हात हातात घेतो. दचकतो. तो स्पर्श अनोळखी. तो तिच्या गालांवरून हात फिरवतो. तो स्पर्शही अनोळखी. ‘कोण आहेस तू? तू तारा नाहीयेस. मला तिचं आवाज माहिती आहे. तिचा स्पर्श माहिती आहे,’ म्हणत तो डोळे झाकत खालती बसकण मारतो. सुमित्रा पुन्हा खोलीत अंधार करायला सांगते. अरुण दुखावला गेलाय, ‘सुमित्रा, मी आंधळा महणून तुम्ही लोकांनी मला धोका दिलात. माझ्याशी खोटं बोललात? नक्कीच माझी खरी तारा माझ्यावर रुसून निघून गेली असणार... मला आता ती कधीच नाही दिसणार...कधीच...’ अरुणचा आक्रोश सहन न होऊन कविता अंधारातच त्याच्याजवळ येते....तिचा आवाज ऐकून अरुण ‘तारा’ म्हणून साद घालतो...तिचे हात हातात घेतो....हा स्पर्श त्याच्या ओळखीचा... तिच्या गालांवरून हात फिरवतो.... तिला ओळखतो...

‘तारा...हो ही आहे माझी तारा...तारा, तू का निघून गेलीस? कुठे गेली होतीस?’ ..
‘मी दूर गेले होते कारण मला पाहून तू माझा तिरस्कार करू नयेस म्हणून..’ 
‘मी आणि तुझा तिरस्कार करेन? का? कसं शक्य आहे हे?’... असं पुटपुटत तो सुमित्राला रूममधले दिवे लावायला सांगतो.... दिवे लागतात... आता त्याच्या मिठीत लज्जेने आणि भीतीने किंचित कंप पावणारी गोड कविता!!.... सुमित्रा त्याचा संभ्रम दूर करते. कविताने तारा बनून त्याची प्रेमाने केलेली शुश्रुषा सांगते... अरुणला सगळा उलगडा होतो... कविताला जवळ घेत तो कबूल करतो, ‘कविता डोळसपणी मी तुला ओळखू शकलो नाही; पण आंधळा झाल्यावर मात्र माझ्या मन:चक्षूंनी तुझं सुंदर मन जाणून घेऊ शकलोय!!’ 

कहाणीचा शेवट गोड! या सिनेमात तारा (सीमा देव) आणि सुभाष (सुधीर) यांची कथा थोडी लांबल्यामुळे सिनेमा थोडा पसरट झालाय; पण तरीही आपल्याला बघताना कुठे कंटाळा मात्र येत नाही. आणि शशी-साधना ही अत्यंत देखणी जोडी पाहत राहावी अशीच! खरंच या गोड जोडीचे आणखी काही सिनेमे एकत्र येते तर......!! 

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZOOBI
Similar Posts
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी
कॅसाब्लांका अनेक विलक्षण गोड क्षणांनी भारून टाकणारं, रिक आणि इल्साच्या आगळ्या प्रेमाची कथा मांडणारं ‘कॅसाब्लांका’चं भूत एकदा मानगुटीवर बसलं की आयुष्यभर उतरत नाही... उपाय एकच असतो... निवांत सुट्टीचा दिवस गाठायचा आणि ‘कॅसाब्लांका’ची डीव्हीडी लावून त्यात हरवून जायचं... ‘सिनेसफर’मध्ये आज पाहू या त्याच सिनेमाविषयी..
अॅन अफेअर टू रिमेम्बर ‘अॅन अफेअर टू रिमेम्बर’ ही १९५७ सालची गाजलेली लव्ह स्टोरी. या सिनेमातल्या अनेक दृश्यांनी पुढे अनेक वर्षं अनेक सिनेमांना स्फूर्ती दिली. प्रवासातल्या एखाद्याशी अचानक होणारी भेट.... त्या ओळखीतून फुलणारी मैत्री.... त्या मैत्रीतून वाढणारा सहवास... आणि त्या सहवासातून जन्माला येणारं प्रेम!.... फार कमी लोकांच्या भाग्यात असे विलक्षण क्षण येतात
दी ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय ब्रह्मदेशावर जपानचा कब्जा असतानाची १९४३ सालची ही कथा. रंगून आणि बँकॉकमध्ये रेल्वेचं दळणवळण सुरू होण्यासाठी आता केवळ क्वाय नदीवरच्या रेल्वेब्रिजचं काम राहिलंय आणि ते करण्यासाठी तिथल्या क्रूर जॅपनीज कर्नल साईटोने ब्रिटिश युद्धकैद्यांना कामाला जुंपायची योजना आखली आहे. एक अमेरिकन नेव्ही कमांडर तो ब्रिज उडवायची कामगिरी शिरावर घेतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language